रविवार, ७ जानेवारी, २०१८

'हिमालप्सह्याद्री' डोंगरयात्रा क्रमांक २/ HimAlpSahyadri Mountain Visit 2




'हिमालप्सह्याद्री' ... म्हणजे  शिवाजी महाराजांबरोबर ( with the statue of Maharaj)  युरोपातले काही डोंगर चढून जाण्याचा उपक्रम ११ डिसेंबर  २०१७ (International Mountain Day)  पासून   सुरु केला आहे   ... आपल्या सर्वांच्या पाठींब्यासाठी धन्यवाद . 

हिमालप्सह्याद्री' मधील दुसरी डोंगरयात्रा नुकतीच केली त्याबद्दल थोडंसं ... अधिक वेळ मिळाल्यास विस्ताराने लिहायचा नक्की प्रयत्न करेन . 


युरोपात गेली सहा वर्ष राहत असताना साल्झबुर्ग  ह्या जर्मनीतल्या   बव्हेरीया ह्या प्रांताला    खेटून असलेल्या नितांतसुंदर  शहरात जाण्याचा कैक वेळा  योग आला होता .   इथे आलं  की असं वाटत की ... जणू काही जगप्रसिद्ध  संगीतकार मोझार्टच्या  Eine Kleine Nachtmusick  च्या सुरावटी   वातावरणात  भरून   राहिल्या आहेत .. आणि   युनेस्को हेरिटेज  म्हणून घोषित केलेल्या ह्या इतिहासप्रसिद्ध शहरा च्या   कोपऱ्याकोपऱ्यात   आणि चोकाचौकात  संगीत भरलं आहे  ....  हे शहर   आणि आसपासचा  परिसर सुंदर आहे   ह्यात शंकाच नाही ..    शहर सोडून  माझी बस   Grödig  च्या दिशेने   धावू लागली   आणि आकाशात घुसलेल्या  UNTERSBERG ( उंटर्सबर्ग )  पर्वतरांगा दिसू लागल्या ...  उत्तर आप्स च्या  पर्वत रांगांचा   एक भाग . 
पायथ्याला   उतरलो     आणि   समोर आभाळात घुसलेली  हिमशिखरं   दिसली ... पण आज   ती   अजिबात परकी वाटत   नव्हती कारण   महाराज बरोबर होते ....   







अलंग , कुलंग  , मदन , कळसुबाई  आणि हरिश्चन्द्रगडच्या   आजतागायत केलेल्या    असंख्य    डोंगरयात्रांच  एकदा स्मरण झालं ... शिवरायांना  एकदा  मनातल्या  मनात  वंदन करून   Dopplersteig  नावाच्या थोड्या खडतर मार्गाने  महाराजांबरोबर    Untersberg उंटर्सबर्ग    गडाकडे कूच  केलं . 
ट्रेकिंग ह्याच क्षेत्रात  १० वर्ष  व्यवसाय म्हणून   आणि आवड म्हणून  २० वर्ष व्यतीत केल्यामुळे , ह्या ट्रेकसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी सोबत होत्या .  हिमदंश प्रतिबंधक पादत्राणे ( koflach)  , GPS , पाणी , आवश्यक First aid ,  उबदार कपडे  इत्यादि . Grödig   च्या रेस्क्यू केंद्राला माझी पूर्ण  माहिती ,  मोबाईल क्रमांक  , रक्तगट  ही सर्व माहिती दिली . 




सूचिपर्णी वृक्षांच्या   (coniferous forest )  दाट   जंगलाचा  पट्टा  पार करून  साधारण दोन तासात   ढगांच्या दुलईत कधी शिरलो हे लक्षात सुद्धा आलं नाही . पुढची चढाई   बर्फातली असल्यामुळे काळजी घेणं गरजेचं  होत .    जवळजवळ तीन ते साडेतीन  तासाच्या   चढाईनंतर  त्या उणे तापमानात सुद्धा चांगलाच घाम फुटला होता . उंटार्बेरग्स होखथोर्न   निम्म्या अंतरावर असावं .  आणि इथेच समोरून DAV ( Deutscher Alpenverein)चं  एक रेस्क्यू पथक येताना  दिसलं . आदल्या दिवशी डोंगरात काही अपघात झाल्यामुळे  त्यांनी Dopplersteig    वरून येणाऱ्या  ट्रेकर्सना त्या मार्गाने जायची मनाई केली होती असं  समजलं आणि आपण ह्या मार्गाने  ही चढाई  पूर्ण करू शकणार नाही ह्या गोष्टीमुळे  थोडी  चिडचिड झाली .  वेळ , पैसे  आणि उद्देश ह्याची सांगड घालत , नीट विचार केला आणि  Grödig   ला परत येऊन केबल कारने   वरती जाण्याचा निर्णय घेतला .   









११ डिसेंबर ला केलेल्या   पहिल्या डोंगर यात्रेत   (  Wasserkuppe)  अशी सोय नव्हती .  मनात  नसताना केबल कारने जावं लागलं ह्याच थोडं वाईट वाटलं पण   महाराजांबरोबर  ह्या प्रांतातील  एका उंच पर्वतावर जाण्याचा उद्देश   जास्ती महत्वाचा होता आणि  पूर्ण दिवस वाया घालण्याऐवजी  आपला मूळ  हेतू साध्य होतोय ना अशी मनाची समजून घालत  वरती आलो . 








..  सुदैवानं  हवा चांगली होती ... आणि सोनेरी  उन्हात     न्हाणाऱ्या    तिथल्या सर्वोच्च  पर्वतमाथ्यावर  शिवरायांसमोर  नतमस्तक झालो.    दुभंगत  चाललेली   मनं   एकत्र यावीत  आणि   जातीचे खोटे अहंकार   गळून  पडावेत   आणि  सर्वत्र  शांतता लाभावी अशी मनोमन विनंती केली . 

क्रमशः


– अजित रानडे 

FB page


https://www.facebook.com/HimAlpSahyadri